Sunday, April 15, 2018

बालपणीचा काळ सुखाचा…


         पावसाळा सुरु झाला कि हमखास  लहानपणीच्या रम्य आठवणी जाग्या होतात. विशेषतः श्रावण तर खास करून आठवतोच . आम्ही अंजनगाव सुर्जी येथे राहायचो. तेव्हा ना  तेथे सिमेंट कॉंक्रिटचे जंगल होते ना  आजच्या सारखी वाहतुकीची गजबज. शांत सुरेख टुमदार गाव. त्यातून आम्ही राहायचो तो वाडा  गावाच्या बाहेर म्हणावा अशाच ठिकाणी. त्यामुळे आजूबाजूला भरपूर मोकळी जागा असायची हुंदडायला. वाड्यात - बिऱ्हाडं रहायची . त्यामुळे खेळायला सवंगड्यांची कमतरता कधीच भासत नसे. पहिल्या पावसात भिजायचा मनसोक्त आनंद उपभोगला तो फक्त लहानपणीच  त्यासाठी कधी आईबाबांनी सर्दी होईल किंवा आजारी पडशील म्हणून रागावल्याचे स्मरत नाही. उलट पहिल्या पावसात  भिजल्याने अंगातील उष्णता निघून जाते, घामोळ्यांचा त्रास नाहीसा होतो म्हणायचे. त्यामुळे आम्ही त्या पहिल्या पावसात अगदी मनसोक्त भिजायचो. आजची छोटी पिढी मात्र ह्या आनंदाला नक्कीच मुकलीय ह्याचा नाही म्हटलं तरी थोडा विषाद वाटतोच..!

Thursday, April 12, 2018

सुखाचा धागा..


काल अगदी दिवसभर कमालीचे उकडत होते. अंगाची  लाही लाही होणे म्हणजे काय ते चांगलच कळलं .  उकाड्याने जीव अगदी हैराण होऊन गेला  होता. रात्री कुलर सुद्धा असून नसल्यासारखाच  वाटत होता . पण दिवसभराच्या थकव्याने झोप बाकी केव्हा लागली कळलेही नाही . नेहमीची वेळेला पहाटे जाग  आली. सगळं आटोपून रोजच्यासारखे फिरायला निघाले तेव्हा कालच्या जीवघेण्या उकाड्याचा मागमूसही नव्हता . आभाळ भरून आलेले अन अगदी आल्हाददायक वारा  सुटलेला.  नक्कीच आसपास कुठेतरी पाऊस पडलेला असावा . काय  प्रसन्न वातावरण होते.

व्हाट्सअपायन..!

          अहो बघितलंत का तुम्ही स्टेटस चिन्मयचं? काssय? सकाळीच बघितलं म्हणता? अहो मग सांगायचं नाही का मला? तुमचं हे असंच असतं! लगेच मी रिप्ल...