Sunday, January 16, 2022

व्हाट्सअपायन..!

          अहो बघितलंत का तुम्ही स्टेटस चिन्मयचं? काssय? सकाळीच बघितलं म्हणता? अहो मग सांगायचं नाही का मला? तुमचं हे असंच असतं! लगेच मी रिप्लाय नसता दिला? काय म्हणता? काsssही बिघडत नाही? अहो बिघडत कसं नाही? मी त्याची सख्खी जन्मदात्री आई अन त्याच्या स्टेटसला माझाच रिप्लाय सगळ्यात शेवटी!

माझ्या सगळ्या मैत्रिणींनी दिला सुद्धा असणार रिप्लाय! एक दिवस मेलं सकाळी व्हाट्स अँप बंद होतं तर नेमकं असं झालं! राहू द्या हो तुम्ही, पुन्हा पुन्हा “काsssही बिघडत नाही!” ची रट नका लावू! सकाळी सकाळी पेपर मध्ये डोकं खुपसून एवढं काय महत्वाचं वाचता म्हणते मी! मी म्हणते  एक दिवस नाही वाचला पेपर तरी “काsssही बिघडत नाही!”  बरं का! थोडं बायकोशी बोललं तर काही नरकात नाही जात लगेच! 


         काय म्हणालात? मी बोलूच देत नाही तुम्हाला? छान! आता हेच ऐकायचं बाकी होतं! माझं तोंड एकदा कायमचं बंद झालं ना की मगच कळेल माझी किंमत! काय? मीच पुन्हा कुठल्या कुठे जाते? जाऊ द्या, तुमच्याशी काही बोलण्यातच अर्थ नाही! मी आपली जातेच कशी. बघा, अकरा वाजले, अजून ही नीता कशी नाही आली पोळ्यांना? येते का नाही देवा! फोन करूनच बघते.  हॅलो, हॅलो .. नीता ना? अगं काय गं कुठे आहेस? वाटच बघतेय तुझी. काय म्हणतेस? सकाळीच मेसेज टाकला होतास व्हाट्स अँप वर! अग फोन नाही का करायचास? काय म्हणालीस? आवाज नाही येत आहे गं नीट! घाईघाईत जावं लागलं म्हणतेस! ठीक आहे, पण उद्या येणार आहेस ना ? अन् मेसेज बिसेज नको टाकूस बाई! सरळ फोन करत जा बाई मला! . . . . हॅलो..,हॅलो...कट झाला वाटतं फोन! 


        बघितलंन अहो,  ही नीताही आजकाल डोक्यावरच बसत चालली आहे. काय म्हणाली माहिताहे? म्हणे तुम्ही सतत तर व्हाट्स अँप वर असता ताई, म्हणून मेसेज टाकला! आता हिला काय करायचं मी व्हाट्स अँप वर राहो का फेसबुक वर राहो! पण खरंच सांगते हो, व्हाट्स अँप, फेसबुक अन त्यावरचे ते सतराशे छप्पन ग्रुप्स! काय काय अन् किती बघणार?  नुसते गुडमॉर्निंग, गुड नाईट अन वाढदिवसाचे बिनकामाचेच मेसेजेस जास्त! नुसतं गरगरतं हो डोकं! कधीकधी तर वाटतंय एखादी नीतासारखी बाईच ठेवावी आता मेसेज डिलीट करायला! 


            तुम्ही का हसताय एवढं गालातल्या गालात? आता मागवा काहीतरी झोमॅटो नाहीतर स्वीगी वरून. मी काsssही एक करणार नाही आज. तसंही आत्ताच बघितलं तर आज आमचा एक वाजता झूम कॉल आहे शाळेच्या ग्रुपचा. सकाळीच कळतं तर डाय नसतं का केलं आत्तापर्यंत? आता पटकन निदान शॅम्पू तरी करते केसांना! थोडा वेळ मेलं व्हाट्स अँप बंद राहिलं तर एवढं सगळं रामायण झालं! सगळे महत्वाचे मेसेज आज सकाळीच यायचे होते मेले! माझ्याच  सोबत असं होतं नेहमी! जाऊ दे मेलं!  अन अहो, प्लीssssज माझ्या त्या गुलाबी कुर्त्याला जरा प्रेस करून देता का? मी त्यात वीस वर्षांनी तरी तरुण दिसते असं तुम्हीच म्हणाले होते ना त्यादिवशी! अहो जरा जळवते न बालमैत्रिणींना! फेसबुक वरची माझी प्रोफाइल बघूनच ह्या साऱ्या मैत्रिणी आधीच तर जळतात माझ्यावर! माझ्याच  एका खासम खास  मैत्रिणीने सांगितलं होतं सगळळं, मागे एकदा भेटली तेव्हा. बरं ते जाऊ दे . तुम्ही आधी तेवढं झोमॅटो अन माझ्या कुर्त्याचं बघा बरं प्लीज. ही आलेच मी पटकन शॅम्पू करून! 


©मधुमती वऱ्हाडपांडे

No comments:

व्हाट्सअपायन..!

          अहो बघितलंत का तुम्ही स्टेटस चिन्मयचं? काssय? सकाळीच बघितलं म्हणता? अहो मग सांगायचं नाही का मला? तुमचं हे असंच असतं! लगेच मी रिप्ल...