Sunday, January 16, 2022

व्हाट्सअपायन..!

          अहो बघितलंत का तुम्ही स्टेटस चिन्मयचं? काssय? सकाळीच बघितलं म्हणता? अहो मग सांगायचं नाही का मला? तुमचं हे असंच असतं! लगेच मी रिप्लाय नसता दिला? काय म्हणता? काsssही बिघडत नाही? अहो बिघडत कसं नाही? मी त्याची सख्खी जन्मदात्री आई अन त्याच्या स्टेटसला माझाच रिप्लाय सगळ्यात शेवटी!

Tuesday, June 15, 2021

फॉल



मी ह्यावेळेस अमेरिकेत गेली तेव्हा फॉल सीझन नुकताच संपत आलेला होता. आपल्याकडे जसे तीन मुख्य ऋतू असतात हिवाळा, उन्हाळा, पावसाळा तसे तेथे विंटर, स्प्रिंग, समर आणि ऑटम हे चार मुख्य ऋतू असतात. पावसाळा वेगळा नसतो. वर्षभर केव्हाही पाऊस पडतो. ऑटममध्ये मुख्यतः सगळी पानगळ होते. ह्या पानगळीच्या ऋतूलाच फॉल म्हणतात. आणि नंतर स्प्रिंग मध्ये सृष्टी पुन्हा सगळा शृंगार करते. मी ऑटम च्या शेवटी शेवटी पोहचली त्यामुळे मला ह्यावेळेस फॉल बघता आला.  फॉल किंवा पानगळीच्या सगळ्या स्टेजेस खूपच  विलोभनीय असतात. सुरवातीला सगळी पानं केशरी, लाल अन् नंतर पिवळीजर्द  होत जातात तेव्हा तर कमालीची  सुंदर दिसतात. आणि नंतर पूर्ण गळून पडतात. मी ह्यावेळेस पहिल्यांदाच बघितल्या ह्या स्टेजेस. आपण जे पेंटिंग्ज मध्ये लाल, केशरी, पिवळ्या रंगांची सुंदर सुंदर झाडं  आणि रस्त्यावर अंथरलेले पानांचे मनमोहक लाल, पिवळे, केशरी गालिचे बघतो तसं प्रत्यक्षात बघायला मिळालं. (सोबत फोटो टाकले आहेत) 

             पानगळ झाल्यावर बाकी सगळे मोठमोठे वृक्ष पूर्ण उघडे बोडखे दिसतात. वेगवेगळ्या उंचीचे, आकाराचे, काही उंचच उंच वाढलेले, काही पसरलेले, काहींच्या फांद्या वेड्यावाकड्या पण आकर्षक कलात्मकतेने पसरलेल्या. संपूर्ण पानगळ झालेली. अख्ख्या झाडावर औषधालासुद्धा एकही पान नाही. मी येथे आल्यावर जेमतेम महिन्याभरात हे स्थित्यंतर झालेले दिसले. काही दिवसांपूर्वीच  हिरव्या गच्च पानांनी आच्छादलेले, फुला फळांनी बहरलेले सगळे वृक्ष हळूहळू लालबुंद  होत गेले, मग पूर्ण पिवळे झाले अन नंतर  एखाद्या नखशिखांत दागिन्यांनी मढलेल्या महाराणीने सगळे दागिने एकेक करून उतरवून ठेवावेत तसा सगळा पर्णसंभार जसा काही  उतरवून ठेवला झाडांनी. 


    एकदा का आपल्या शरीरावरचं सगळं ओझं उतरवून टाकलं की मग सगळी झाडं  मूकपणे, निःशब्द अवस्थेत जणू चिंतन करत उभे असतात! एखाद्या स्थितप्रज्ञासारखे निश्चल..! संपूर्ण पानगळ झालेले  ते गगनचुंबी वृक्ष मला सर्वसंगपरित्याग केलेल्या योग्यांसारखे वाटायचे. त्यांची सगळी गतीच थांबलेली दिसायची. पानांची सळसळ नसल्याने सगळीकडे वेगळीच स्तब्धता दाटून आल्यासारखी वाटायची.  चोहीकडे अशी शांत उभी, उघडी बोडखी, उजाडलेली झाडं! मात्र स्प्रिंग सुरु होताच हे सगळं दृश्यच एखादी जादूची कांडी फिरावी तसं पटापट  बदलतं. पुन्हा सगळी सृष्टी हिरवीगार होऊन डोलायला लागते,  ती सगळी झाड पुन्हा फुलतात, बहरतात. अगदी सहजपणे. जणू पुन्हा नव्याने जन्म घेतात. आपल्याकडेही शिशिरात पानगळ होते पण ती इतकी प्रकर्षाने  जाणवत नाही. कदाचित आजूबाजूला इतक्या प्रचंड संख्येने वृक्ष नसतात म्हणूनही जाणवत नसावं कदाचित. 


                    

              पानगळीच्या मौसमातली तिथली सगळी झाडं बघून सहजच  मनात आलं आपल्यालाही असं जमलं तर? खरंच किती छान होईल! ह्या झाडांसारखा असाच ठराविक  दिवसांमध्ये दरवर्षी एक ब्रेक घ्यायचा. जसा ते आपला पर्णसंभार उतरवून ठेवतात, अगदी तस्संच काही काळ आपले सगळे मुखवटे खरंच उतरवून ठेवायचे अन त्यांच्यासारखंच शांत, स्तब्ध राहून चिंतन करायचं, वर्षभराचा आपला आपणच आढावा घ्यायचा. एकजात सगळी अहंकाराची, रागाची, लोभाची, इर्षेची, मत्सराची, मोहाची पानगळ होऊ द्यायची. आपल्याच मनाचा तळ दिसेल असं मन स्वच्छ करायचं. काय बरोबर, काय चूक तपासून बघायचं. झालेल्या चुका खुल्या मनाने स्वीकारून टाकायच्या. दुरुस्त होण्याजोग्या नसतील तर निदान त्यापासून धडा घेऊन त्या पुन्हा होणार नाहीत ह्याची काळजी घ्यायची. अन एकदा का हा सगळा  “फॉल” आटोपला की पुन्हा टवटवीत नवीन पालवी फुटू द्यायची! मनात आलं, खरंच जमेल का हे आपल्याला? कठीण तर आहेच  पण प्रयत्न करून पाहायला काय हरकत आहे? नाही का?


©मधुमती वऱ्हाडपांडे



Thursday, April 15, 2021

पण ही “महाराष्ट एक्सप्रेस”च न?


माझं लग्न झालं त्यानंतर एक-दोन वर्षातला हा किस्सा!  पीयुष अगदी तान्हा होता तेव्हाची गोष्ट. थोडी पार्श्वभूमी सांगते आधी. माझी MSc ची परीक्षा झाल्या झाल्या मला अकोल्यालाच शिवाजी कॉलेजला जॉब मिळाला आणि त्याच दरम्यान लग्नही ठरलं. अकोल्याला चालू सेशन पूर्ण करून मी वर्धेला सासरी आली. लगोलग बाळराजेंचंही आगमन झालं.

Tuesday, February 16, 2021

दुधावरची साय

साय तशी माझी जिवाभावाची अन आवडतीच. पहीली दुसरीत असतांना भुलाबाईच्या गाण्यात "आपे दुध तापे त्यावर पिवळी साय, लेकी भुलाबाई पाटल्या लेवून जाय" म्हणायचो तेव्हा माझ्या डोळ्यासमोर एक भला मोठा दुधाचा गंज, त्यात तापवलेले गाईचे दूध अन वर आलेला दाट घट्ट सायीचा थर असं चित्र यायचं. नंतर योगायोगाने  लग्न झाल्यावर घरच्या गाईंच्या दूध दुभत्याचं सुख ही अनुभवलं. तेव्हा रोजच दुधावर आलेली घट्ट दाट साय बघतांना "आपे दूध तापे" ची आठवण यायची. दुध पोळीचा कुस्करा करून त्यावर छान भरपूर साय घेऊन खायला मला खूप आवडायच. खरं  तर अजुनही आवडतंच. तसंच मऊ मऊ ताज्या ब्रेडवर थंडगार  दूध टाकून त्यावर  मस्तपैकी सायीचा थर अन वर थोडीशी साखर भुरभुरून खायलाही खूप आवडतं. सायीसकट लावलेल्या दह्याची लस्सीही आवडीचीच. एवढंच नाही तर   बासुंदीवर आलेली दाट  सायदेखील  मटकावयाला मला  खूप आवडते. तर सांगायचं तात्पर्य एवढंच की कुठल्याही फॉर्म मधली साय माझी आवडतीच. 

Sunday, November 15, 2020

“रुजण्या” वरून सहजच..


मध्यंतरी lockdown मुळे बाहेर फिरणं बंदच होतं. त्यामुळे सकाळ संध्याकाळ एखादी चक्कर गच्चीवर असायचीच. आमचं राहणं फ्लॅट सिस्टिम मध्ये त्यामुळे गच्ची सगळ्यांचीच कॉमन. आमचा फ्लॅट तिसऱ्या अन सगळ्यात वरच्या मजल्यावर. आमच्या खाली राहणाऱ्या बिऱ्हाडकरुंना गॅलरीतल्या बागेची मोठी हौस.

Thursday, September 3, 2020

तिचा श्रावण

 








श्रावण महिना आला की 

ऊनपावसाचा खेळ बघतांना 

दिसतं तिला त्यात

आपलंच प्रतिबिंब !


क्षणातच  दाटून येतात 

तिच्याही  मनात 

अलवार आठवणींचे

तेच गच्चं ओले ढग..!

अन धो धो बरसायला लागतो 

तिच्या डोळयांतून तोच वेडा पाऊस!


आणि एकदा का वाहून गेलं

मनात साठलेलं सगळं मळभ 

की स्वच्छ उन्हासारखं 

पारदर्शी होऊन जातं तिचं 

आरस्पानी मन… 

पावसात न्हाऊन तृप्त 

झालेल्या सृष्टी सारखं !

 

म्हणून  तर ती सदैव 

जिवंत ठेवते श्रावणातल्या

त्या लहरी ऊनपावसाला… 

अन बाराही महिने 

जपत राहते मनात 

तेच गच्चं ओलं आभाळ !

तेच गच्चं ओलं आभाळ !


मधुमती वऱ्हाडपांडे











Thursday, August 20, 2020

माझे वाचन - एक गुंतवणूक


   “ माझे वाचन - एक गुंतवणूक” ह्या विषयावर एका ग्रुप वर लिहायचे होते. तेव्हा पहिल्यांदा तर हेच मनात आले की त्यावर आपण काय लिहिणार? आपले वाचन अगदी यथातथाच!  त्यात विशेष सांगण्यासारखे काय आहे? पण पुन्हा विषय वाचल्यावर लक्षात आले “माझे वाचन- एक गुंतवणूक”  यातला “गुंतवणूक” हा शब्दच खूप काही सांगून जाणारा आहे.  गुंतवणूक म्हटल्यावर ती थोडीशी का असेना पण कालांतराने खूप मोठा परतावा देतेच. त्या दृष्टीने विचार करायला लागले तर मात्र मला जाणवलं भलेही माझं वाचन तोकडं असेल पण त्याने मला आयुष्यात किती मोठा फायदा झालाय तो केवढा मोलाचा आहे हे विसरून चालणार नाही म्हणूनच मग या गुंतवणुकीबद्दल नक्की लिहायलाच हवे असे मनापासून वाटले. 

व्हाट्सअपायन..!

          अहो बघितलंत का तुम्ही स्टेटस चिन्मयचं? काssय? सकाळीच बघितलं म्हणता? अहो मग सांगायचं नाही का मला? तुमचं हे असंच असतं! लगेच मी रिप्ल...