Sunday, November 15, 2020

“रुजण्या” वरून सहजच..


मध्यंतरी lockdown मुळे बाहेर फिरणं बंदच होतं. त्यामुळे सकाळ संध्याकाळ एखादी चक्कर गच्चीवर असायचीच. आमचं राहणं फ्लॅट सिस्टिम मध्ये त्यामुळे गच्ची सगळ्यांचीच कॉमन. आमचा फ्लॅट तिसऱ्या अन सगळ्यात वरच्या मजल्यावर. आमच्या खाली राहणाऱ्या बिऱ्हाडकरुंना गॅलरीतल्या बागेची मोठी हौस.

Thursday, September 3, 2020

तिचा श्रावण

 








श्रावण महिना आला की 

ऊनपावसाचा खेळ बघतांना 

दिसतं तिला त्यात

आपलंच प्रतिबिंब !


क्षणातच  दाटून येतात 

तिच्याही  मनात 

अलवार आठवणींचे

तेच गच्चं ओले ढग..!

अन धो धो बरसायला लागतो 

तिच्या डोळयांतून तोच वेडा पाऊस!


आणि एकदा का वाहून गेलं

मनात साठलेलं सगळं मळभ 

की स्वच्छ उन्हासारखं 

पारदर्शी होऊन जातं तिचं 

आरस्पानी मन… 

पावसात न्हाऊन तृप्त 

झालेल्या सृष्टी सारखं !

 

म्हणून  तर ती सदैव 

जिवंत ठेवते श्रावणातल्या

त्या लहरी ऊनपावसाला… 

अन बाराही महिने 

जपत राहते मनात 

तेच गच्चं ओलं आभाळ !

तेच गच्चं ओलं आभाळ !


मधुमती वऱ्हाडपांडे











Thursday, August 20, 2020

माझे वाचन - एक गुंतवणूक


   “ माझे वाचन - एक गुंतवणूक” ह्या विषयावर एका ग्रुप वर लिहायचे होते. तेव्हा पहिल्यांदा तर हेच मनात आले की त्यावर आपण काय लिहिणार? आपले वाचन अगदी यथातथाच!  त्यात विशेष सांगण्यासारखे काय आहे? पण पुन्हा विषय वाचल्यावर लक्षात आले “माझे वाचन- एक गुंतवणूक”  यातला “गुंतवणूक” हा शब्दच खूप काही सांगून जाणारा आहे.  गुंतवणूक म्हटल्यावर ती थोडीशी का असेना पण कालांतराने खूप मोठा परतावा देतेच. त्या दृष्टीने विचार करायला लागले तर मात्र मला जाणवलं भलेही माझं वाचन तोकडं असेल पण त्याने मला आयुष्यात किती मोठा फायदा झालाय तो केवढा मोलाचा आहे हे विसरून चालणार नाही म्हणूनच मग या गुंतवणुकीबद्दल नक्की लिहायलाच हवे असे मनापासून वाटले. 

Wednesday, July 29, 2020

कॅनव्हास - एक अनोखा कलाप्रवास

 “रंगुनी रंगात साऱ्या, रंग माझा वेगळा" ह्या कविवर्य सुरेश भटांच्या पंक्तींचा पानोपानी अनुभव देणारं  "कॅनव्हास" हे अच्युत गोडबोले आणि त्यांची सहलेखिका दीपा देशमुख यांचे  अतिशय अभ्यासपूर्ण, तितकेच रंजक आणि भारावून  टाकणारे  पुस्तक!  एकूण 588 पृष्ठसंख्या असलेले हे पुस्तक मुखपृष्ठापासूनच आपल्या मनाचा ठाव घेते. मुखपृष्ठाबद्दल विशेष सांगण्यासारखे म्हणजे हे मुखपृष्ठ पुस्तकाच्या लेखिकेने स्वतः डिझाइन केले आहे! त्यावरचे लिओनार्दो चे  मोनालिसा आणि पिकासोचे "ले दंवाझेल दाव्हिया" लक्ष वेधून घेतात.

Friday, July 24, 2020

सणांच्या निमित्याने ….

हा लेख प्रपंच करायला कारणही तसेच झाले . ह्यावेळेस कशी कोण जाणे नागपंचमीच्या दिवशी आज नागपंचमी आहे हेच विसरून गेले. रोजच्यासारखी सकाळची कामे पटापट आटोपून पेपर चाळायला  घेतला तेव्हा दिसले आज नागपंचमी म्हणून . मग रुख्ररुख  लागून राहिली अशी कशी विसरले म्हणून.

सुनीताबाई

सुनीताबाई देशपांडे!  मराठी साहित्यसृष्टीतील एक अढळ तारा, महाराष्ट्राचे सर्वाधिक लाडके अन लोकप्रिय लेखक,  पु. ल. देशपांडे ह्यांच्या अर्धांगिनी!  हे एक सामान्यातलं असामान्य व्यक्तिमत्व! प्रखर,तीक्ष्ण बुद्धीमत्तेचं वरदान लाभलेली ही स्त्री मंगला गोडबोलेंच्या "सुनीताबाई" ह्या पुस्तकातून आपणासमोर विविध मनोज्ञ रूपात उलगडत जाते. पुस्तकाच्या सुरवातीलाच मंगलाताई म्हणतात कि हा काही गौरव ग्रंथ किंवा स्मृती ग्रंथ नाही , किंवा आरतीसंग्रह नाही तर त्यांना उमगलेल्या ह्या विलक्षण व्यक्तिमत्वाचा मागोवा घेण्याचा प्रयत्न आहे. त्यामुळेच हे संस्मरण नुसतचं  रंजक नसून अनेक  वेगवेगळ्या अर्थांनी उदबोधक झाले आहे. 1990 साली  प्रसिद्ध झालेल्या सुनीताबाईंच्या  'आहे मनोहर तरी ...' ह्या  परखड आत्मचरित्रपर पुस्तकाने साहित्यविश्वात खळबळ  उडवून दिलेली होती. अगदी मुखपृष्ठापासूनच आगळ्या वेगळ्या ठरलेल्या ह्या पुस्तकावर अनेकांनी विविध प्रतिक्रिया व्यक्त केल्यात. सुनीताबाईंवर भरपूर टीकाटिप्पणी ही झाली आणि तरीही त्यावर्षीच ते सर्वाधिक खपाचे पुस्तक ठरलं. मंगला गोडबोलेंनी ह्या पुस्तकात “आहे मनोहर तरी.." मधले बरेच संदर्भ वापरले आहेत. "सुनीताबाई" हे पुस्तक तीन भागांमधे विभागले आहे. "असं जगणं" , "असं लिहिणं" आणि "असं वागणं" ! 

Wednesday, July 22, 2020

माझं चीज कोणी हलवलं ?

पुस्तकं तर आपण अनेक वाचतच असतो नेहमी. काही वरवर चाळतो, काही अर्धवट वाचतो , काही काही पुनः पुन्हा वाचतो. काही तिथल्यातिथे विसरून जातो तर काही मनात खूप दिवस घोळत राहतात. काही खूप काही शिकवतात, काही अंतर्मुख करतात. आज ज्या पुस्तकाबद्दल सांगतेय ते एक लहानसे पण फार मोठं तत्व शिकवणारे पुस्तक आहे.  "माझं चीज कोणी हलवलं ?" हे  ते पुस्तक. अगदी छोटेसे, एका बैठकीत पूर्ण होणारे, खूप काही सकारात्मक बदल आपल्यात घडवण्याची शक्ती असलेले  डॉ. स्पेंसर जॉनसन ह्यांच्या ओघवत्या भाषाशैलीतील हे पुस्तक. मूळ इंग्रजीतील "Who Moved My Cheese?“ ह्या पुस्तकाचा अनुवाद. 

प्रकाशक - मंजुल पब्लिशिंग हाऊस, किंमत - 125-/ रुपये

ह्या पुस्तकात दोन छोटे उंदीर आहेत स्निफ आणि स्करी नावाचे आणि त्याच आकाराची दोन छोटी माणसे हेम आणि हॉ. या चार काल्पनिक पात्रांचा आधार घेऊन जगण्यातील एक शाश्वत सत्य लेखकाने मांडलंय...

एक अप्रतिम क्लायमॅक्स…

C:\Users\Vikram\Desktop\images.jpg

           काल  रात्री सहजच यु ट्यूब वर जुने पिक्चर कुठले आहेत बघत होते तर "अभिमान" दिसला. थोडावेळ बघू या म्हणत म्हणत केव्हा शेवट आला कळलेच नाही. आणि त्यातला तो शेवटचा सीन! काय अप्रतिम रंगवलाय अमिताभ-जयाने! कितीदाही बघितला तरीसुद्धा डोळे पाणवण्याची जबरदस्त ताकद असलेला! सत्तरीच्या दशकातला, हृषीकेश मुखर्जींसारख्या दिग्गजाने दिग्दर्शित केलेला हा चित्रपट.  जया-अमिताभच्या सशक्त अभिनयाची जुगलबंदी आणि  बिंदू, हंगल,दुर्गा खोटे, डेविड, असरानी सारख्या कसलेल्या  सहकलाकारांसह एकूण एक जळून आलेली व्यक्तिरेखा ह्यामुळे हा चित्रपट एक मास्टरपीस  ठरतो...

माझी मावशी

आज नऊ फेब्रुवारी. माझ्या मावशीचा (श्रीमती रेवती श्रीपाद खांदेवाले) जन्मदिवस. तिला जाऊन आता 11 वर्षे झालीत. पण असा एकही दिवस जात नाही की तिची आठवण आली नाही. काय कुणास ठाऊक पण तिचा-माझा काही वेगळाच ऋणानुबंध होता! आमच्या लहानपणी मावशी मुंबईला राहायची. आमची परिस्थिती खाऊनपिऊन सुखी अशी. आमचे सगळेच नातेवाईक जवळपास त्याच स्थितीतले. आमची राहणी वगैरे अगदी साधीसुधी. त्या पार्श्वभूमीवर आत्ताच्या भाषेत सांगायचं तर मावशी म्हणजे आम्हाला एकदमच हाय फाय वाटायची. मावशीचे यजमान मुंबईला सरकारी खात्यात चांगल्या मोठया हुद्यावर होते. वर्षा दोन वर्षातून एखादेवेळेला मावशी यायची आमच्या घरी अंजनगावला. लहानपणी आम्हाला तिच्याबद्दल एक वेगळेच कुतूहल असायचे...

मामाचं पत्र हरवलं ..!


इमेज सौजन्य -गुगल 
आठवतं का तुम्हाला लहानपणी मोठ्ठा गोल बनवून "मामाचं पत्र हरवलं ...तेच आम्हाला सापडलं!" खेळलेलं? चाळीशी ओलांडलेल्या सगळ्यांना तर  नक्कीच आठवतं असेल ते. केवढी मजा यायची न ? सहजच ती आठवण आली अन चेहऱ्यावर एक हलकीशी स्मितरेषा उमटली. दुसऱ्याच क्षणी मात्र त्याची जागा किंचित विषादाने घेतली. वाटलं ह्या टेक्नोसॅव्ही जगात खरंच कुठे हरवून गेलंय ते मामाचं पत्र आता? कुणालाच न सापडण्यासाठी! 

हा छंद जीवाला लावी पिसे ...


   आज पन्नाशी ओलांडल्यावर खरोखरच ह्या ओळींची प्रचीती येतेय. आणि सारखं  मनात आल्यावाचून राहवत नाही कि इतके  दिवस  का आपण ह्या आनंदा पासून कसे काय  वंचित राहिलो?  लहानपणी drawing आवडायचं . खंर तर तेव्हापासूनच abstract (अमूर्त शैलीतील चित्र) बद्दल एक खास आकर्षण वाटायचं. वेड्यावाकड्या ओढलेल्या रेघोट्या आणि त्यातून व्यक्त  होणारे वेगवेगळे आकार मोहवून टाकायचे. रिकाम्या वेळात वह्यांच्या मागच्या पानावर काहीबाही चित्र मी बरेचदा काढायची. पण बस्स तेवढेच. नंतर मग अभ्यास , पुढच शिक्षण, नंतर लग्न, नोकरी, मुलं, त्यांचं सगळं करणं, घर संसार इ. इ. हे सगळं करण्यात आपल्याला काही आवड होती हेच मुळी विसरून गेली होती.

Wednesday, July 1, 2020

गाठोडं



 




 
 
आपापलं गोठोडं खांद्यावर घेऊन 
चालताय ती दोघे कधीचे 
लांबच लांब उदास रस्ता 
कंटाळवाणा अन संपणारा !
गोठोड्यात दोघांनीही खचाखच भरल्यात
जुन्या अप्रिय आठवणी,
उपेक्षा, अपेक्षा अन  मानापमान
एकाचं उत्तर, दुसऱ्याचं प्रत्युत्तर
एकाचा अभिमान, दुसऱ्याचा अहंकार!...

Tuesday, June 30, 2020

पाऊस काय फक्त आभाळातूनच येतो ?

                    
 
 
मणामणांचं ओझं असतं कधी साठलेलं 
कुठेतरी खोलखोल काहीबाही दाटलेलं 
हलकासा धक्का नकळत लागतो 
धो धो भरून कोसळायला लागतो 
पाऊस काय फक्त आभाळातूनच येतो ? 

बोलकी भांडी ..!


काल मिक्सर चे भांडे दुरुस्त करायला म्हणून आमच्या नेहमीच्या स्टील च्या दुकानात ‘स्टील पॅलेस’मधे  गेले. मिक्सर त्याच्याकडूनच घेतले होते. त्याची एजन्सी त्याच्याकडे असल्याने काही प्रॉब्लेम आला की तेथेच जावे लागते. एरवी सुद्धा मला त्या  दुकानात जायला फार आवडतं.  त्याच्याकडे एकतर चांगल्या क्वालिटी चे स्टील असते आणि दुसरं म्हणजे तेथे सगळी छान छान चकचकीत भांडी इतकी सुंदर शिस्तीत लावून  ठेवली असतात की बस्स, बघत राहावेसे वाटते. सुमारे ३० वर्षांपासून मी बघतेय, तेव्हासुद्धा अशीच छान लावून ठेवलेली चक चक चकाकणारी भांडी बघून खूप प्रसन्न वाटायचे...

अप्रूप

        मला वाटतं आजकाल हा शब्दच मुळी नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. कुणालाच कशाचंच अप्रूप वाटेनासं झालं आहे.  अर्थात हे व्यक्ती सापेक्ष आणि परिस्थिती सापेक्ष आहे हे ही  तितकेच खरे आहे म्हणा!  सगळं काही पाहिजे तेव्हा, पाहिजे तेवढं भरभरून मिळतं तेव्हा अप्रूप वाटेलच कसं कशाचं? खाण्यापिण्याचं म्हणा, कपड्यालत्याचं म्हणा, प्रवासाचं म्हणा की कसल्या हौसेमौजेचं म्हणा. मनात काही येण्याचाचं अवकाश कि सगळं कसं अल्लाउद्दीनचा दिवा घासल्याबरोबर त्यातल्या राक्षसाने हात जोडून, 'हुकूम सरकार!' म्हणत पुढे आणून ठेवावे तस्से हजर असते.  मला वाटतं अजून पुढच्या पिढीला तर अल्लाउद्दीन वगैरे  कथा म्हणजे एकदम भंकस वाटतील. त्यांना वाटेल की अल्लाउद्दीन कशाला हवा असतो बुवा, सगळं काही तर मनात येण्यापूर्वीच मिळत असतं विनासायास!

गणिती



           अच्युत गोडबोले आणि डॉ. माधवी ठाकूरदेसाई यांनी संयुक्तपणे लिहिलेलं  “गणिती” हे अतिशय माहितीपूर्ण आणि तितकेच रंजक असे पुस्तक! गणितावर प्रेम करणाऱ्यांसाठी तर ही एक मेजवानीच! गणितासारख्या अतिशय रुक्ष आणि क्लीष्ट समजल्या जाणाऱ्या विषयावर तब्बल 465 पानांचे पुस्तक लिहिणे आणि वाचकाला अगदी शेवटच्या पानापर्यंत त्यात गुंतवून ठेवणे ही किमया अच्युत गोडबोलेच करू शकतात ह्याची खरोखर हे पुस्तक वाचतांना प्रचिती येते!
            
        तसं पाहिलं तर निसर्गातल्या प्रत्येक गोष्टीत गणित असतं. पण आपल्याला त्याची जाणीव नसते किंवा माहिती नसते. पशु, पक्षी, वनस्पती सगळ्यांच्या शरीररचनेत, ते बांधत असलेल्या घरांमध्ये, फर्निचर मध्ये, घरट्यांमध्ये एक विशिष्ट प्रकारचे गणित दडलेले असते. झाडांना येणारी पाने एक विशिष्ट क्रमाने येतात असे आढळून येते.  मधमाश्यांची उत्पत्तीही एका ठराविक क्रमाने होते, बऱ्याच फुलांच्या पाकळ्यांतही  काही विशिष्ट क्रम दिसून येतो. ही  क्रमरचना फिबोनाची क्रमिकेशी (Fibonacci series) मिळतीजुळती असते. 1,1,2,3,5,8,13,21,.... ह्या क्रमवारीला फिबोनाची सिरीज म्हणतात. ह्यातली  प्रत्येक संख्या ( पहिले दोन वगळता) आधीच्या दोन संख्याची बेरीज असते. निसर्गातल्या अनेक गोष्टींमध्ये आपल्याला हे सिरीज आढळते...

गेले द्यायचे राहून तुझे नक्षत्रांचे देणे ..!


        आशा भोसलेंच्या आर्त स्वरात आरती प्रभुंच्या ओळी कानावर पडल्या अन आत कुठेतरी हलल्यासारखं झालं. वाटलं, आपण खूप प्रेम करीत असलेल्या व्यक्तीला काहीही कारण नसतांना ते सांगणं जेव्हा राहूनच जातं तेव्हा किती कालवाकालव होत असेल न काळजात! अन गाणं ऐकता ऐकता नकळतच आईची मूर्ती डोळ्यासमोर आली अन डोळे भरून आले.
        आईला जाऊन आता पाच वर्षे झालीत. तिची ती नऊवारी नेसलेली, गोरीशी, कपाळावर ठळक कुंकू लावलेली, नाजूक बांध्याची आणि शांत चेहऱ्याची मूर्ती डोळ्यासमोर येते. अचानकच ध्यानी मनी नसतांना ती गेली. आदल्या दिवशी मी तिला दारातच उभ्याउभ्या भेटली होती, नेहमीप्रमाणेच घाईघाईत होती मी. "आत येते का ग?" तिनेही सवयीने विचारले. "अग, उशीर झालाय ग ! छोटू आला असेल घरी, येते मी!" म्हणत म्हणत मी गाडीवर बसलीसुद्धा...

व्हाट्सअपायन..!

          अहो बघितलंत का तुम्ही स्टेटस चिन्मयचं? काssय? सकाळीच बघितलं म्हणता? अहो मग सांगायचं नाही का मला? तुमचं हे असंच असतं! लगेच मी रिप्ल...