Wednesday, July 1, 2020

गाठोडं



 




 
 
आपापलं गोठोडं खांद्यावर घेऊन 
चालताय ती दोघे कधीचे 
लांबच लांब उदास रस्ता 
कंटाळवाणा अन संपणारा !
गोठोड्यात दोघांनीही खचाखच भरल्यात
जुन्या अप्रिय आठवणी,
उपेक्षा, अपेक्षा अन  मानापमान
एकाचं उत्तर, दुसऱ्याचं प्रत्युत्तर
एकाचा अभिमान, दुसऱ्याचा अहंकार!...

सप्तपदीतल्या प्रत्येक पावलागणिक
जड जड होत गेलं
दोघांच्याही खांद्यावरचं गाठोडं ..
गोठोड्याच्या ओझ्याने 
इतके  वाकून गेलेत दोघेही की 
रस्त्याच्या दुतर्फा खुणावणारे ताटवे 
त्यांना दिसलेच नाहीत कधी
जिवाच्या आकांताने 
आपापलं गाठोडं सांभाळण्यातच 
मग्न होते दोघेही !

चालता चालता थकून भागून 
शेवटी एका वळणावर 
गाठोडं त्यांना खाली ठेवावंच लागलं 
वळून बघतात तर काय ?
वेडावत होते त्यांना मागे पडलेले 
रंगेबिरंगी फुलांचे ताटवे 
अन हसत होते छद्मी पणे 
त्यांनी टाकून दिलेले गाठोडे !
त्यांनी टाकून दिलेले गाठोडे !

मधुमती वऱ्हाडपांडे 

No comments:

व्हाट्सअपायन..!

          अहो बघितलंत का तुम्ही स्टेटस चिन्मयचं? काssय? सकाळीच बघितलं म्हणता? अहो मग सांगायचं नाही का मला? तुमचं हे असंच असतं! लगेच मी रिप्ल...