काल रात्री सहजच यु ट्यूब वर जुने पिक्चर कुठले आहेत बघत होते तर "अभिमान" दिसला. थोडावेळ बघू या म्हणत म्हणत केव्हा शेवट आला कळलेच नाही. आणि त्यातला तो शेवटचा सीन! काय अप्रतिम रंगवलाय अमिताभ-जयाने! कितीदाही बघितला तरीसुद्धा डोळे पाणवण्याची जबरदस्त ताकद असलेला! सत्तरीच्या दशकातला, हृषीकेश मुखर्जींसारख्या दिग्गजाने दिग्दर्शित केलेला हा चित्रपट. जया-अमिताभच्या सशक्त अभिनयाची जुगलबंदी आणि बिंदू, हंगल,दुर्गा खोटे, डेविड, असरानी सारख्या कसलेल्या सहकलाकारांसह एकूण एक जळून आलेली व्यक्तिरेखा ह्यामुळे हा चित्रपट एक मास्टरपीस ठरतो...
पती पंत्नीच्या नात्याची हळुवार गुंफण सुरेखपणे उलगडतांना पुरुषप्रधान संस्कृतीतल्या नवऱ्याच्या मानसिकतेवर प्रकाश टाकणारी एक सुंदर कथा. पतीच्या पुरुषी अहंकाराला लागलेली ठेच संसार कसा उध्वस्त करू शकते हे फार छान रीतीने चित्रित केलय. कारण कितीही म्हटले तरी पुरुषप्रधान संस्कृतीचा पगडा समाजातून इतक्या सहजतेने नाहीसा होणे थोडे अवघडच. मला तर वाटतं आजच्या तरुण पिढीला , विशेषतः एकाच क्षेत्रात काम करणाऱ्या पती-पत्नींना बरेचदा ह्या सिच्युएशन ला तोंड द्यावे लागत असणार. त्यांनी हा चित्रपट जरूर बघावा. चित्रपटाची थोडक्यात कथा अशी- सुब्बीर कुमार (अमिताभ) हा मुंबईत राहणारा उभरता, तरुणाई चा लाडका पॉप गायक. शहरात, प्रसिद्धीच्या झगमगत्या जगात वावरणारा. सध्या प्रसिद्धीच्या अत्त्युच्च शिखरावर पोहचलेला. आपल्या गावात राहणाऱ्या मावशीला सहजच भेटायला म्हणून येतो आणि तेथे त्याची भेट उमाशी (जया) होते. उमा एक सुशील, सुंदर पण अतिशय साधी तरुणी. अप्रतिम गळ्याची देणगी मिळालेली. तिचं साधेपणातलं निष्पाप सौंदर्य आणि असामान्य टॅलेंट बघून सुब्बीर तिच्या प्रेमात न पडता तरच नवल! चार पावसाळे पाहिलेल्या मावशीच्या अर्थातच सगळे लक्षात येते आणि मग शुभमंगल करूनच सुब्बीर उमासह शहरात परत येतो. आल्यावर स्वतः तिला गाण्यासाठी प्रोत्साहित करतो. "मैं सिर्फ तुम्हारे साथ ही गाऊंगी" हा तिचा आग्रहही हळूहळू सुब्बीर मोडून काढतो अन मग उमा यशाची एक एक पायरी ओलांडताना कशी त्याच्याही पुढे निघून जाते हे दोघांनाही कळत नाही. इथे बाकी चित्रपट थोडे वेगळे वळण घेतो. सुरवातीला उमाच्या यशाने अंतर्बाह्य फुलून येणारा सुब्बीर हळूहळू त्याच यशाने नकळत अस्वस्थ व्हायला लागतो. त्याचा हा अस्वस्थपणा, ती न सांगता येणारी तगमग अमिताभ ने फारच सुंदर रंगवलीय. ह्याची परिणीती अर्थातच दोघांच्या दुरावत जाणाऱ्या नात्यात होते आणि नेमके हेच उमाला नको असते. सुब्बीर ची ही तगमग, आतल्या आत होणारी घुसमट सहन न होऊन शेवटी उमा आपल्या वडिलांच्या घरी परत येते ती गाण्याला आपल्या आयुष्यातून कायमचं हद्दपार करूनच! केवळ निखळ आनंदासाठी गाणारी उमा, ते गाणे च आणि जीवापाड प्रेम केलेला सुब्बीर आयुष्यातुन निघून गेल्याने कोलमडून जाते. तरीसुद्धा सुब्बीर आपणाला न्यायला नक्की येईल हा आस मनात बाळगून असते. अहंकाराला ठेच लागलेला सुब्बीर माघार घ्यायला तयार होत नाही. वाट बघून बघून हळूहळू उमाच्या सगळ्या संवेदना गोठत जातात आणि शेवटी एका जिवंत प्रेतासारखी तिची अवस्था होते. हे सगळं सहन न होऊन शेवटी सुब्बीर ची मावशी त्याच्याकडे जाऊन त्याची चांगली कानउघाडणी करते अन मग बाकी पश्च्यातापदग्ध सुब्बीर उमाला परत घेऊन येतो. आपली चूक उमगलेला सुब्बीर आता सगळ्या संवेदना हरवलेल्या उमेला पूर्ववत करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करतो. शेवटी त्याला पित्यासमान असणारे त्याचे संगीत दिग्दर्शक त्याला सल्ला देतात की संगीत हा उमाचा आत्मा आहे. ते तिच्या जीवनात परत आले तर ती पुन्हा पहिल्यासारखी होऊ शकते. आणि मग जाणीव पूर्वक एक ‘सूर झंकार’ चा कार्यक्रम आयोजित केला जातो. कार्यक्रमाला सुब्बीर उमाला घेऊन येतो. पहिलच गाणं "देखो ना, तेरे मेरे मिलन की रैना…", जे एकेकाळी दोघांनी आपल्या सुखी संसाराचे स्वप्न रंगवताना गाईलेले असते ते गायला लागतो अन ते स्वर कानी पडताच बाकी, क्षणभर कावऱ्याबावऱ्या झालेल्या उमेच्या डोळ्यासमोर झर्रकन सगळ्या जुन्या घटना एखाद्या चलतपटा सारख्या तरळून जातात अन उमा उन्मळून पडते, ओंजळीत तोंड लपवून ओक्साबोक्सी रडायला लागते. तिला स्टेज वर आणण्यात येते आणि नाही नाही म्हणत म्हणतच ती सुब्बीरच्या सुरात सूर मिसळून गायला लागते. त्या दृश्यात जया कमालीची सुंदर दिसली आहे. काठापदराची पांढरीशुभ्र साडी, केसांचा जाडजूड अंबाडा, त्यावरून ओढलेला पदर आणि चेहऱ्यावर प्रतिबिंबित होणाऱ्या भावनांचा कल्लोळ! अप्रतिम अभिनय अन साधेपणातलं सोज्ज्वळ सौंदर्य! तिला परत एकदा गातांना बघून कार्यक्रमाला आलेले प्रेक्षकही पाणावलेले डोळे पुसत पुसत टाळ्यांचा प्रचंड कडकडाट करतात आणि चित्रपट इथेच संपतो. ह्या शेवटच्या प्रसंगात जयाने जी अभिनयाची उंची गाठली आहे त्याला तोड नाही. ह्या एका सीन मध्ये ती खरोखरच अमिताभच्याही वरचढ ठरते. थिएटर मध्ये बसलेल्या एकूण एक प्रेक्षकाच्या डोळ्यांच्या कडा ओलावणारा हा भावमधुर असा क्लायमॅक्स! मधुमती वऱ्हाडपांडे, अकोलाआपलं मन म्हणजे जणू एक कॅलिडोस्कोपचअसतो. क्षणाक्षणाला त्यावर विविधरंगी प्रतिमा उमटत राहतात. त्यातल्या काहींना शब्दबद्ध केल्या जाते, कधी ललित, कधी कथा तर कधी कवितेच्या रूपात! व्यक्त होण्याचा हा एक अल्पसा प्रयत्न.. !
Subscribe to:
Post Comments (Atom)
व्हाट्सअपायन..!
अहो बघितलंत का तुम्ही स्टेटस चिन्मयचं? काssय? सकाळीच बघितलं म्हणता? अहो मग सांगायचं नाही का मला? तुमचं हे असंच असतं! लगेच मी रिप्ल...
-
पुस्तकं तर आपण अनेक वाचतच असतो नेहमी. काही वरवर चाळतो, काही अर्धवट वाचतो , काही काही पुनः पुन्हा वाचतो. काही तिथल्यातिथे विसरून जातो तर काही...
-
साय तशी माझी जिवाभावाची अन आवडतीच. पहीली दुसरीत असतांना भुलाबाईच्या गाण्यात "आपे दुध तापे त्यावर पिवळी साय, लेकी भुलाबाई पाटल्या लेवून ...
-
आज नऊ फेब्रुवारी. माझ्या मावशीचा (श्रीमती रेवती श्रीपाद खांदेवाले) जन्मदिवस. तिला जाऊन आता 11 वर्षे झालीत. पण असा एकही दिवस जात नाही की तिची...
No comments:
Post a Comment