Tuesday, June 30, 2020

अप्रूप

        मला वाटतं आजकाल हा शब्दच मुळी नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. कुणालाच कशाचंच अप्रूप वाटेनासं झालं आहे.  अर्थात हे व्यक्ती सापेक्ष आणि परिस्थिती सापेक्ष आहे हे ही  तितकेच खरे आहे म्हणा!  सगळं काही पाहिजे तेव्हा, पाहिजे तेवढं भरभरून मिळतं तेव्हा अप्रूप वाटेलच कसं कशाचं? खाण्यापिण्याचं म्हणा, कपड्यालत्याचं म्हणा, प्रवासाचं म्हणा की कसल्या हौसेमौजेचं म्हणा. मनात काही येण्याचाचं अवकाश कि सगळं कसं अल्लाउद्दीनचा दिवा घासल्याबरोबर त्यातल्या राक्षसाने हात जोडून, 'हुकूम सरकार!' म्हणत पुढे आणून ठेवावे तस्से हजर असते.  मला वाटतं अजून पुढच्या पिढीला तर अल्लाउद्दीन वगैरे  कथा म्हणजे एकदम भंकस वाटतील. त्यांना वाटेल की अल्लाउद्दीन कशाला हवा असतो बुवा, सगळं काही तर मनात येण्यापूर्वीच मिळत असतं विनासायास!

        पण आम्ही खरंच भाग्यवान! आमच्या लहानपणी तसं नव्हतं काही. आम्हाला खूप साऱ्या छोट्या छोट्या गोष्टींचंही अप्रूपच  असायचं. आम्ही राहायचो अंजनगावला. छोटेसे टुमदार गाव. एकदम खेडंही  नाही म्हणता येणार आणि  शहरही नाही असे. मस्त भरपूर मोकळी जागा, भरपूर सवंगडी खेळायला, आणि भरपूर वेळ सुद्धा. अभ्यासाचं, निरनिराळ्या क्लासेसचं  आणि जीवघेण्या स्पर्धेचं मुळी सुद्धा टेन्शन नव्हतं. खायचं, प्यायचं आणि बागडायचं असं ते रम्य बालपण. आमच्या गावात ब्रेड वगैरे सुद्धा नाही मिळायची तेव्हा!  त्यामुळे त्या साध्या ब्रेडचं सुद्धा अप्रूपच असायचं आम्हाला. कधीमधी बाबांना शाळेच्या कामासाठी अमरावतीला जावे लागायचे, तेव्हा बाबा मग तेथून पालेकरची मोठ्ठी ब्रेड आणायचे. कोण खुश व्हायचो आम्ही तेव्हा! ब्रेड ला येणारा व्हॅनिला चा तो मंद मंद सुवास,त्या पांढऱ्या पांढऱ्या, मऊ मऊ चौकोनी स्लाईसेस,  त्याच्या त्या खरपूस  विटकरी रंगाच्या कडा, त्याची ती स्पंज सारखी जाळी! दुधात बुडवून खातांना अक्षरशः सुखाची परमावधी वाटायची तेव्हा!  

        आणखी तशीच तेव्हाची आणखी  एक चविष्ट आठवण म्हणजे आमच्या दारावरून  " द~हि ..  व~डे..  कचोरी~ये.... !" असे मोठ्ठ्याने ओरडत जाणारा रोजचा कचोरीवाला. त्याच्या त्या आवाजाने तोंडाला असं पाणी सुटायचं की  काही विचारू नका. यायचा रोजच पण तेव्हा असं सर्रास बाहेरच खाण्याची पद्धत अजिबातच नव्हती. त्यामुळे कचोरी आम्हाला क्कचितच मिळायची.  तीन चार  महिन्यातून एखाद्या वेळेला बाबा म्हणायचे "आज आपण घेऊ बरं का कचोरी दुपारी!"  झालं, आम्ही दुपारी केव्हा तो कचोरीवाला येतो याची वाट  बघत बसायचो. एकदाचा दुरून त्याचा नेहमीचा परीचित आवाज ऐकायला यायला लागला की आम्ही फाटकापाशी धावत जाऊन  त्याला बोलवायचो. त्या कचोरीवाल्याचा तो काहीसा कळकट मळकटलेला वेष अजूनही माझ्या  चांगला लक्षात आहे. पांढुरक्या रंगाचा थोडासा आखूड पायजामा, कोणत्यातरी फिक्कट रंगाचा शर्ट, डोक्यावर काळपट रंगाची टोपी, पायात तुटक्याफुटक्या  वहाणा, काखेत एक अवर ग्लास च्या आकाराचे लोखंडी स्टॅन्ड आणि डोक्यावर  पसरट आकाराचे एक मोठठे टोपले!  त्यात कचोऱ्या आणि बाकीची सामग्री रचून ठेवलेली असायची. जवळ आल्याआल्याच कचोरीचा तो खमंग वास थेट नाकात जायचा आणि  केव्हा एकदा कचोरी खातो असं होऊन जायचं. आल्याआल्या त्याचं ते लोखंडी स्टॅन्ड जमिनीवर ठेऊन त्यावर तो डोक्यावरचे पसरट टोपले काढून ठेवायचा. मग एक एक टप्पोरी कचोरी काढून त्यात दही, बारीक चिरलेला पातीचा कांदा, तिखट, मीठ, बारीक शेव असं सगळं टाकून एकदाची ती कचोरी आमच्या हातात यायची. त्या दह्यात अर्धवट भिजलेल्या खमंग, खुसखुशीत कचोरीचा  पहिला घास जिभेवर कसा अलगद  विरघळायचा!  मिटक्या मारत मारत आम्ही पोटभर त्या कचोऱ्या खायचो. मग काही एकच मिळेल वगैरे काही बंधन नसायचं. आमची आई नेहमी म्हणायची खातांना कसं मन तृप्त होईल असं खावं, त्यामुळे मग मनसोक्त खाऊन घ्यायचो. अजूनही त्या कचोरीची चव आठवली कि तोंडाला पाणी सुटतचं. बाकी तसं खाण्याच्या गोष्टींचं जास्त कौतुक नसायचं एरवी. कारण भरपूर करणे आणि पोटभर खाऊ घालणे हा आमच्या आईचा आवडता उद्योग होता. त्यामुळे आम्ही भावंडं नेहमी कसे तृप्त असायचो. 

        नवीन कपड्यांचं पण अप्रूप असायचंच. अर्थात कपडे वगैरे आमच्या चॉईस ने नसायचेच कधी. म्हणजे त्यात काही चॉईस असतो हेच आमच्या गावी नव्हते. आमचे कपडे बाबाच आणायचे. एवढे मात्र खरे कि बाबा नेहमीच चांगल्या प्रतीचे कपडे घ्यायचे आम्हा भावंडांना. पण कपडे आणायच्या वेळा ठरलेल्या. एक ड्रेस दसऱ्याला, एक दिवाळीला, रोज घालायचे दोन, आणखी एखादा अधेमधे आणि शाळेचे दोन युनिफॉर्म.  एवढे कपडे अगदी रग्गड वाटायचे.

        सगळ्यात मज्जा यायची ती तर श्रावण महिन्यात आमच्या गावात  काठीची यात्रा भरायची त्यात. त्यात आम्हाला अगदी मनसोक्त खरेदी करता यायची. चक्क 15, 20 रुपये मिळायचे तेव्हा आम्हाला खर्चायला. आमच्यासाठी ती एक पर्वणीच असायची. केव्हढा उत्साह असायचा तेव्हा. उठल्यापासूनच 4 वाजताचे वेद लागायचे आम्हाला. सगळ्याजणी मैत्रिणी जमायचो आणि चिवचिवत निघायचो जग खरेदी करायला निघाल्याच्या थाटात. तिथे पोहचल्यावर तर त्या सगळ्या छोट्या छोट्या दुकानां मध्ये काय नसायचं ते विचारा . . !  छोटे छोटे रंगीबेरंगी प्लास्टिकचे खेळणे,भांडी, गाड्या,विमानं, फुलं, बॉल,बांगड्या, कानातले, गळ्यातले, टिकल्या आणीक  काय काय ... बुढढीचे बाल काय, खरमुरे काय अन पॉपकॉर्न काय, आईस फ्रुट काय,... केवढं अप्रूप असायचं त्या सगळ्या गोष्टींचं!  सगळं त्या 15, 20 रुपयात मस्त जमायचं. खरेदीचा मनसोक्त आनंद लुटायचो तेवढ्याश्या पैशात आम्हीं. छोट्या छोट्या गोष्टींचा भरभरून आनंद लुटता येण्याचे ते रम्य दिवस. आता ते सगळं आठवलं कि खूप हसायला येतं. पण मन त्या आठवणींमध्ये रंगून जातं अन देवाला प्रार्थना करावीशी वाटते की देवा, वय कितीही वाढू दे पण एखाद्या गोष्टी बद्दल अप्रूप वाटण्याएवढं मन बालीश नक्की ठेव.  कशाचंच अप्रूप नाही वाटलं तर जगण्यात मजा तरी काय येईल हो? खरंय की नाही?     

मधुमती वऱ्हाडपांडे 
अकोला

2 comments:

Unknown said...

अगदी चित्रमयी वर्णन.कचोरीने तर तोंडाला पाणी सुटले.

Madhumati Waradpande said...

धन्यवाद !🙏🏻

व्हाट्सअपायन..!

          अहो बघितलंत का तुम्ही स्टेटस चिन्मयचं? काssय? सकाळीच बघितलं म्हणता? अहो मग सांगायचं नाही का मला? तुमचं हे असंच असतं! लगेच मी रिप्ल...