Thursday, August 20, 2020

माझे वाचन - एक गुंतवणूक


   “ माझे वाचन - एक गुंतवणूक” ह्या विषयावर एका ग्रुप वर लिहायचे होते. तेव्हा पहिल्यांदा तर हेच मनात आले की त्यावर आपण काय लिहिणार? आपले वाचन अगदी यथातथाच!  त्यात विशेष सांगण्यासारखे काय आहे? पण पुन्हा विषय वाचल्यावर लक्षात आले “माझे वाचन- एक गुंतवणूक”  यातला “गुंतवणूक” हा शब्दच खूप काही सांगून जाणारा आहे.  गुंतवणूक म्हटल्यावर ती थोडीशी का असेना पण कालांतराने खूप मोठा परतावा देतेच. त्या दृष्टीने विचार करायला लागले तर मात्र मला जाणवलं भलेही माझं वाचन तोकडं असेल पण त्याने मला आयुष्यात किती मोठा फायदा झालाय तो केवढा मोलाचा आहे हे विसरून चालणार नाही म्हणूनच मग या गुंतवणुकीबद्दल नक्की लिहायलाच हवे असे मनापासून वाटले. 

 अगदी लहानपणापासून सुरुवात करायची तर तेव्हा आमचे बाबा अंजनगाव सुर्जी या लहानशा गावातील शाळेत शिक्षक होते.  आम्ही भावंड अगदी लहान असतांना बाबा नेहमी शाळेतून आमच्यासाठी वाचायला “अमर चित्र कथा” या सिरीयल मधली पुस्तके म्हणजेच कॉमिक्स घेऊन यायचे.  ती माझी पहिली ओळख वाचनाची! त्या वयात त्या चित्ररूपी कथा अश्या काही मनावर बिंबल्या की अजूनही एखादी पुराणातली किंवा ऐतिहासिक व्यक्तिरेषा म्हटली की ते बालपणी अमर चित्र कथेत बघितलेले चित्र अजूनही जसेच्या तसे डोळ्यासमोर उभे राहते.


         नंतर बाबांनी चांदोबा, किशोर, मुलांचे मासिक  या मासिकांची वर्षभराची भरलेली वर्गणी सुद्धा आठवते. ते माझे  अमर चित्र कथे नंतरचे दुसरे सवंगडी. त्या सगळ्या कथा बालमनावर कुठेतरी कोरल्या गेल्यात आणि चांगलं वागलं की त्याचं फळ नेहमी चांगलंच  मिळत असतं,  दुष्ट लोकांना शेवटी त्यांच्या कर्माचे फळ मिळतचं, हे मनावर पक्कं बिंबलं गेलं. मला तर वाटतं हीच माझ्या  आयुष्यातली सर्वात सुंदर गुंतवणूक होती. माझी आवड बघून बाबांनी मग शाळेच्या ग्रंथपालाची माझी गाठ घालून दिली मग तर काय मला पूर्ण लायब्ररीला केव्हाही भेट द्यायची मुभा मिळाली. मग सुट्ट्यांमध्ये अधाश्यासारखी पुस्तक वाचून संपवायची.  जादूची अंगठी, हिमगौरी आणि सात बुटके, जादूची छडी, पेटीतला राक्षस, परोपकारी गंपू  वगैरे वगैरे कथांमधून भेटणारे गरीब ब्राह्मण, राजे, राण्या, राजकन्या, राजकुमार, सुष्ट आणि दुष्ट लोक इत्यादी अनेक पात्रं डोक्यात एक चित्र तयार करत गेलेत आणि  त्या वयातलं भावविश्व समृद्ध होत गेलं.  त्यातूनच मनावर ठसत गेले की जगातल्या  दुष्ट लोकांचा जगातले सज्जन माणसं  नेहमी पराभव करतात, सत्याचाच  शेवटी विजय होतो वगैरे वगैरे!  असे हे बाल मनावर झालेले संस्कार ह्यासारखी अजून कुठली चांगली गुंतवणूक असू शकेल जगात ? 

              

            नंतर मग माझ्या हातात श्यामची आई पडले. ते वाचल्यानंतर  तर बालवयातल्या त्या संस्कारक्षम मनावर खूप खोलवर असा परिणाम झाला. नंतर मग शेवग्याच्या शेंगा, वहिनींच्या बांगड्या वगैरे कादंबऱ्यांमधून  नकळत माणसामाणसांमधील नातेसंबंध, नात्यांमधली गोडी हे मनावर ठसत गेले आणि नकळत भावविश्व आणखी समृद्ध करत गेले. नंतर फास्टर फेणे सारख्या पुस्तकांनी वेड लावलं. मध्यंतरी मग रहस्यकथा, भयकथा हातात आल्या आणि श्वास रोखून त्या वाचण्यातला थरार आवडायला लागला. नंतर सातवी-आठवीत असताना मात्र ज्या पुस्तकाने माझ्यावर खोल प्रभाव पडला ते पुस्तक म्हणजे मृत्युंजय ! मृत्युंजय ने तेव्हा अक्षरशः झपाटून टाकलं होतं. मी  ते पुन्हा पुन्हा वाचलं. तिथून खऱ्या अर्थाने वाचन थोडंफार समृद्ध होत गेलं. त्यातल्या एकूण एक व्यक्तिरेखा खूप खोलवर मनात रुतून बसल्या आणि कर्ण माझ्या मनात कायमचा एक हिरो म्हणून विराजमान झाला. 


                नंतरच्या काळात मग काही दिवस आशा बगे, सुमती क्षेत्रमाडे, योगिनी जोगळेकर यांच्या कथा कादंबऱ्यांनी मनाची जागा व्यापली. मग स्वप्नातला राजकुमार म्हणजे रुंद खांद्याचा, देखणा,  रुबाबदार, कर्तबगार वगैरे वगैरे होत गेला! ! नंतर पुलं, वपु, शिरीष कणेकर, मंगला गोडबोले वगैरे वगैरे मंडळी त्यांच्या हटके लिखाणाने आवडायला लागलीत. त्यांनी कधी हसवलं, कधी रडवलं  तर कधी अंतर्मुख व्हायला शिकवलं! नंतर जयंत नारळीकर, निरंजन घाटे, बाळ फोंडके वगैरेंच्या विज्ञान कथा झपाटून टाकायला लागल्या.  त्याचबरोबर अमृत, विचित्र विश्व, रीडर्स डायजेस्ट, किस्त्रीम वगैरे वगैरे मासिकेही  आवर्जून वाचल्या जातच होती. त्यातून झालेली गुंतवणूक सुद्धा आज मागे वळून पाहतांना नक्कीच जाणवते. गंमत म्हणजे तेव्हा आमच्याकडे किराणा आला की तो भरणे माझे आवडते काम असायचे कारण  त्यावेळी किराणा कागदाच्या पुड्यांमधून यायचा. किराणा भरताभरता खूप काही विविध विषयांवरचे वाचायला मिळायचे. मात्र  काही अर्धवट कथा किंवा मजकूर हुरहूर लावून जायचा. 


नंतर बाकी BSc साठी अकोला, नंतर  MSc साठी अमरावती ला जावं लागलं . मग अभ्यास, प्रोजेक्ट्स,परीक्षा, मैत्रिणी, हॉस्टेल लाइफ वगैरे मध्ये फारसं वाचन झालंच नाही. मात्र ह्या दरम्यान वाचलेली काही सकारात्मक पुस्तके कायम प्रेरणा देत राहिलीत. नंतर बाकी Msc पास झाल्याझाल्या लग्न झालं. खूप मोठे संयुक्त कुटुंब, वर्षभराचे सणवार, येणारे  जाणारे पाहुणे, घरात सतत काहीतरी सुरूच असायचे. त्यातच पाहिलं वहिलं बाळ झालं आणि मग त्याचं  संगोपन, त्याच्या बाळलीला वगैरे वगैरे मधे वाचन नकळतच बाजूला पडलं.  नंतर माझी नोकरी सुरु झाली अन मग तर मी कमालीची व्यस्त झाली आणि मधली अनेक वर्षे वाचन म्हणजे फक्त वर्तमानपत्राच्या हेडलाईन्स इतकच मर्यादित राहिलं. यथावकाश दुसरं अपत्य झालं. पुन्हा सगळं तेच चक्र ! ह्या सगळ्यांमध्ये वाचन बाजूलाच पडत गेलं. तरीसुध्दा मध्यंतरी पुन्हा काही सुंदर पुस्तके वाचनात आलीत. द सीक्रेट, मेगालिविंग, द पॉवर ऑफ सबकॉन्शस माइंड, यू कॅन विन ह्या पुस्तकांनी खूप काही शिकवलं. काही चांगल्या नवीन  सवयी लावल्या. ही सुद्धा केवढी मोठी  गुंतवणूकच होती !  


         नंतर बाकी मुलं शिक्षणाच्या निमित्याने बाहेर गेलीत.  मीही काही कारणास्तव नोकरी सोडली आणि आता आयुष्याच्या ह्या वळणावर मला माझे जुने जिवाभावाचे मित्र पुन्हा खुणावू लागले. पुन्हा एकदा त्यांना साद दिली अन ह्या तीन चार वर्षात खूप दिवसांचे वाचायचे राहिलेले अनेक मान्यवरांचे चरित्र, आत्मचरित्र वाचलेत. सुनीताबाई देशपांडे ह्यांचे “आहे मनोहर तरी”, माधवी देसाई ह्यांचे “नाच ग घुमा”, सुधीर फडके ह्यांचे “जगाच्या पाठीवर”, अच्युत गोडबोले ह्यांचे “मुसाफिर”, यशवंतराव चव्हाण ह्यांचे “कृष्णाकाठ”, शांता शेळके ह्यांचे “धूळपाटी”, शिरीष कणेकर ह्यांचे “मी- माझं -मला”, साधना आमटे ह्यांचे “समिधा”, वीणा गवाणकर ह्यांचे “एक होता कार्व्हर”, रमाबाई रानडे ह्यांचे “आमच्या आयुष्यातील काही गोष्टी”,  लक्ष्मीबाई टिळकांचे “स्मृतिचित्रे”, नरेंद्र जाधव यांचे “आमचा बाप आन आम्ही” अशी कितीतरी पुस्तके! वाचतांना थक्क होऊन जातो. ह्या सगळ्यांचा जगावेगळा संघर्ष, आपापल्या ध्येयासाठीचं त्यांचं  झपाटलेपण, वाचता वाचता अंतर्मुख होऊन आपल्याला आपले प्रश्न, आपल्या अडचणी अतिशय खुज्या वाटायला लागतात. अशारितीने आता ह्या “सेकंड इनिंग” मध्ये माझा वाचन प्रवास पुन्हा सुरु झालाय. वाचनाचे एवढे मोठे भांडार ह्या जगात आहे आणि सुदैवाने आज ते एका क्लिक उपलब्ध होऊ शकते आहे ही केव्हढी जमेची बाजू आहे. आणि मग वाचता वाचता असेच कधीतरी “देणाऱ्याने देत जावे,घेणाऱ्याने घेत जावे, घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हातच  घ्यावे” ह्या न्यायाने सुचलेले काहीबाही लिहू पण लागले आणि त्याला जवळच्या जवळचे मित्र-मैत्रिणी नातेवाईक यांची मिळालेली दाद आणखी प्रोत्साहित करून गेली. काही लोकांचे मार्गदर्शनही मिळाले आणि त्यांनी सुचवलेली काही सुंदर सुंदर पुस्तकेही  वाचनात आली आणि हे असं करता करता मुलांच्या मदतीने माझा एक छोटासा ब्लॉग पण सुरु केला. निवांतपणे बसून विचार करते तेव्हा माझी बालपणीची अगदी छोटीशी  गुंतवणूक आज केवढा मोठा परतावा देते आहे हे बघून मन समाधानाने भरून जाते आणि उर्वरित आयुष्यात ही गुंतवणूक आणखी आणखी समृद्ध होत जातो  हीच ईश्वरचरणी प्रार्थना करते ! 


मधुमती वऱ्हाडपांडे 

8 comments:

Ashwini said...

खूप छान लिहिलं आहेस आणि " गुंतवणूक " हा शब्द तर अगदी फिट्ट बसतो वाचनाच्या बाबतीत

Gauri sheetal said...

वाचाल तर वाचाल ,किती समर्पक आहे ,गुंतवणूक च आहे ती आनंदाची, समाधानाची, छान लेख👌👍डॉ.अब्दुल कलाम म्हणून गेले आहेत की 'वाचनामुळे मला ज्ञानाबरोबर आनंद ही दिला आहे माझे ग्रंथालय माझ्यासाठी सर्वात मोठी मौल्यवान ठेव आहे,तिथे व्यतीत केलेला प्रत्येक क्षण सर्वात मौजेचा आणि समाधानाचा आहे'

Madhumati Waradpande said...

धन्यवाद अश्विनी ! 🙏🏻

Madhumati Waradpande said...

धन्यवाद गौरी ! 🙏🏻

Swati Damodare said...

खरंय मधुमती
ही गुंतवणूक multiply होत जाते
आणि amazing returns देते🤗🤘💐

Mangalmurti Shastri said...

आजच सौ सुधा मूर्ती यांची मुलाखत ऐकली ...वाचन हि सगळ्यात मोठी गुंतवणूक आहे .त्यांच्या कडे प्रत्येकाची वेगळी लायब्ररी आहे म्हणताच आंनद झाला !
आणि तुझं स्फुट त्याच्याशी नातं जोडणारं . छानच लिहिले .लहानपणापासून असेच वाचायला आम्म्हाही मिळाले . अन परत परत तेच पुस्तक वाचनीय वाटतात ... लहाणपनचे संस्कार बाकी काय

Madhumati Waradpande said...

अगदी खरं! 🙏🏻🙏🏻

Madhumati Waradpande said...

हो. अगदी बरोबर !🙏🏻

व्हाट्सअपायन..!

          अहो बघितलंत का तुम्ही स्टेटस चिन्मयचं? काssय? सकाळीच बघितलं म्हणता? अहो मग सांगायचं नाही का मला? तुमचं हे असंच असतं! लगेच मी रिप्ल...