Wednesday, July 22, 2020

हा छंद जीवाला लावी पिसे ...


   आज पन्नाशी ओलांडल्यावर खरोखरच ह्या ओळींची प्रचीती येतेय. आणि सारखं  मनात आल्यावाचून राहवत नाही कि इतके  दिवस  का आपण ह्या आनंदा पासून कसे काय  वंचित राहिलो?  लहानपणी drawing आवडायचं . खंर तर तेव्हापासूनच abstract (अमूर्त शैलीतील चित्र) बद्दल एक खास आकर्षण वाटायचं. वेड्यावाकड्या ओढलेल्या रेघोट्या आणि त्यातून व्यक्त  होणारे वेगवेगळे आकार मोहवून टाकायचे. रिकाम्या वेळात वह्यांच्या मागच्या पानावर काहीबाही चित्र मी बरेचदा काढायची. पण बस्स तेवढेच. नंतर मग अभ्यास , पुढच शिक्षण, नंतर लग्न, नोकरी, मुलं, त्यांचं सगळं करणं, घर संसार इ. इ. हे सगळं करण्यात आपल्याला काही आवड होती हेच मुळी विसरून गेली होती. काही दिवसांपूर्वी मात्र माझी भाची अमृता, जी स्वतः छान पेंटिंग करते तिच्याजवळ मी सहज बोलून गेली कि मलाही खूप पेंटिंग करावेसे वाटते तर तिने इतक्या उत्साहाने स्वतः जवळचे रंग , ब्रशेस , कॅनव्हास  सगळं माझ्यासमोर ठेवले अन म्हणाली "आत्या, तुला नक्की जमेल, करून तर बघ". झालं. अश्यारितीने माझ्या पेंटिंग चा श्रीगणेशा झाला. अन बघताबघता मी त्यात इतकी गुंतून गेले कि एकामागून एक पेंटिंग करण्याचा सपाटाच लावला. 

        मनापासून आवडणारी गोष्ट करायला मिळाली कि मग आपसूकच मार्ग मिळतो , वेळही  काढता येतो हे लक्षात आले.  एकदा नवीन पेंटिंग सुरु केल्यावर मग ते पूर्ण होत पर्यंत सतत डोक्यात ते वेगवेगळे आकार, ते रंग, त्यांच्या मिश्रणातून तयार होणाऱ्या त्या वेगवेगळ्या शेड्स हे सगळं  चक्र फिरत राहतं. मनसोक्त रंगांशी खेळायला मिळतं.  कॅनव्हास वर रंग एकमेकांमध्ये मिसळून तयार होणारी रंगांची उधळण अक्षरशः वेड लावते आणी पेंटिंग पूर्ण झाल्या वर मग जे समाधान मिळते त्याला तर खरच तोड नाही. कुठल्याही निर्मितीचा आनंद बाकी खरच शब्दातीत असतो. तेव्हापासून सतत कितीतरी  पेंटिंग्ज  केलेत. आणि हे करतांना अकोल्यातील प्रथितयश  कलाकार श्री. प्रतापसिंग राठोड तसेच राज्यपुरस्कार प्राप्त आर्टिस्ट श्री. सतीश पिंपळे ह्यांचे मार्गदर्शन आणि प्रोत्साहन मिळाल्याने माझा उत्साह आणखी वृद्धिंगत झाला. श्री. पिंपळे सरांच्या सहकार्याने अकोल्यात माझे एक छोटेसे प्रदर्शन पण झाले आणि नंतर मुंबईला आर्ट्स प्लाझा येथे दुसरे प्रदर्शन झाले. त्यावेळेला  जहांगीर आर्ट गॅलरीत खूप चांगल्या कलाकारांचे प्रदर्शन पाहायला मिळाले. फोर्ट ला फूटपाथवर काही सुंदर चित्रकलेसंबंधी  पुस्तकं विकत घेतली, तिथल्या काही गॅलरीत सुंदर सुंदर चित्रांचा मनोसोक्त आस्वाद घेतला. प्रत्येक चित्र तुम्हाला काहीतरी नवा अनुभव देतं, नवीन शिकायला मिळतं  हा अनुभव आला.       
  
        नंतर नागपूरला एका आर्ट कॅम्प ला जाण्याचा योग आला तेथे असच एक अब्स्ट्रॅक्ट काढलं. आणि आश्चर्य म्हणजे मला त्यात उत्तेजनार्थ बक्षीस मिळालं! त्यावेळी झालेला आनंद खरोखरच अवर्णनीय होता. त्याने एक वेगळाच  हुरूप आला.. आणखी उत्साहाने चित्र काढायला लागली. त्याच आर्ट कॅम्प मध्ये बेसेकर मॅडम शी ओळख झाली आणि त्यांनी दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्र बद्दल माहिती दिली. त्या केंद्रा तर्फेच मग नागपूरच्या राजा रवी वर्मा आर्ट गॅलरीत ६ दिवसांचा एक सोलो शो  झाला. त्या प्रदर्शनात मी तब्बल ६५ पेंटिंग्ज ठेवले होते. त्या  दरम्यान राजा  वर्मा आर्ट गॅलरी ला लागूनच ऑरेंज सिटी महोत्सव सुरु होता. त्यामुळे तेथे येणाऱ्या लोकांपैकी जे कलासक्त होते  त्यांची पाऊले आपसूकच गॅलरी कडे वळलीत. तेथे आलेले सगळे पत्रकार पण डोकावून गेलेत.  त्यावेळेला नागपूरच्या पत्रकारांचा खूप छान अनुभव आला. त्यांनी इतके छान कव्हरेज दिले कि काहीही जाहिरात न करता भरभरून  प्रसिद्धी मिळाली. सगळ्यांनी खूप कौतुक केले. मला तर सगळं स्वप्नवतच वाटत होतं. त्यानंतर तेथे ओळख  झालेले काही कलाकार  मिळून पुण्याला कोथरूडच्या यशवंतराव चौव्हाण आर्ट गॅलरीत ग्रुप शो केला तेव्हा पुण्याच्या काही प्रसिद्ध कलाकारांची ओळख झाली. त्यांचे काम बघता आले. त्यातूनही अर्थातच खूप नवीन गोष्टी कळल्या. त्यानंतर श्रीलंकेला कोलंबो येथे  होणाऱ्या एका प्रदर्शनात सहभागी व्हायची संधी मिळाली. तो अनुभवही खूप काही देऊन, खूप काही शिकवून गेला. हे सगळं इतकं झपाट्याने झाले कि मलाच माझ्या आयुष्यातल्या ह्या अचानक घेतलेल्या वळणाचे आश्चर्य वाटल्यावाचून राहत नाही. 

        मधल्या कालावधीत आम्ही माझ्या मुलाकडे कॅलिफोर्नियाला जवळपास ३  महिने गेलो  होतो. तेव्हा त्याने अगदी सगळं ईस्ट कोस्ट,  वेस्ट कोस्ट मनसोक्त फिरवलं.सगळचं किती सुंदर! सेव्हन्टीन माईल नावाने प्रसिद्ध असलेल्या  एका  नितांतसुंदर रस्त्यावरून जातांना निळ्याशार सुमुद्राचे दर्शन अक्षरशः भान हरवून गेले.  जेथे नजर जाईल तेथे विधात्याने निर्मिलेले भव्य दिव्य अप्रतिम लँडस्केपच दिसत होते जणू! काय आणि किती सांगावे हेच कळत नाही. ते प्रवासवर्णन हा एक वेगळा स्वतंत्र विषय आहे. विषयाला धरून सांगायचे तर त्या सगळ्या प्रवासात मला सगळ्यात मनापासून आवडलेली गोष्ट म्हणजे सॅनफ्रॅन्सिस्कोचे ‘डी यंग आर्ट म्युझिअम’ आणि SFMOMA म्हणजे ‘सॅनफ्रान्ससिस्को म्युझिअम ऑफ मॉडर्न आर्ट'! ह्या दोन्ही ठिकाणी मी मनसोक्त वेळ घालवला. एक एक पेंटिंग बघतांना भान हरपून जात होतं. मात्र काही पेंटिंग्ज मात्र अनाकलनीय वाटले. अर्थात तो माझ्या कुवतीचा भाग नसावा कदाचित. माझी आवड बघून मुलाने नंतर  वॉशिंग्टन चे ‘नॅशनल आर्ट म्युझिअम’ पण दाखवले. हे सगळं बघत बघत नकळतच काही गोष्टी आतमध्ये उमटत गेल्या, चित्र बघण्याची एक नवीन दृष्टी मिळाली हे मात्र नक्कीच. आणि तसंही प्रत्येकाच्या आत शिकण्याची एक सूक्ष्म क्रिया अखंड चालूच असते म्हणतात. त्या न्यायाने प्रत्येकवेळी काहीतरी नवीन शिकायला मिळाले हे निश्चित! 

        हा माझा आतापर्यंतचा छोटासा चित्र प्रवास! परमेश्वर कृपेने शेवटपर्यंत हि कलेची ओढ, नवनिर्मितीची क्षमता अशीच राहो  आणि प्रत्येक निर्मितीतून माझ्याबरोबरच इतरांना सुद्धा आनंद मिळो हीच प्रार्थना! 










4 comments:

Unknown said...

खूप छान उतरलं आहे शब्दातून

Madhumati Waradpande said...

धन्यवाद !🙏🏻

Madhumati Waradpande said...

धन्यवाद !🙏🏻

Nilima Kshatriya said...

सुंदर!!

व्हाट्सअपायन..!

          अहो बघितलंत का तुम्ही स्टेटस चिन्मयचं? काssय? सकाळीच बघितलं म्हणता? अहो मग सांगायचं नाही का मला? तुमचं हे असंच असतं! लगेच मी रिप्ल...