हा लेख प्रपंच करायला कारणही तसेच झाले . ह्यावेळेस कशी कोण जाणे नागपंचमीच्या दिवशी आज नागपंचमी आहे हेच विसरून गेले. रोजच्यासारखी सकाळची कामे पटापट आटोपून पेपर चाळायला घेतला तेव्हा दिसले आज नागपंचमी म्हणून . मग रुख्ररुख लागून राहिली अशी कशी विसरले म्हणून.
रुखरुख एवढ्यासाठी की आमच्याघरी अशी पद्धत आहे की नागपंचमीच्या दिवशी सकाळी स्नान करून देवाला, नागोबाला (म्हणजे देवघरातल्या नागाच्या प्रतिमेला) नमस्कार केल्याशिवाय घोटभर पाणीसुद्धा प्यायचे नाही. माझे लग्न झाल्यापासून मी हे पाळत आली. घरातले सगळे करतात म्हणून. आपल्या घरी तशी पद्धत आहे म्हणून. खर म्हणजे सक्काळी उठल्या उठल्या एक मोठा ग्लास पाणी पिण्याची माझी खूप जुनी सवय. पण वर्षानुवर्षे नागपंचमीला केवळ तशी पद्धत आहे म्हणून ते पाळत आलेली. आज विसरले तर उगाचच काहीतरी चुकल्यासारखे वाटायला लागले. मग बाकी थोड्यावेळाने विचार करायला लागली. खर तर अस फारसं काय बिघडलं होतं ? हेही मान्य फार फार पूर्वी काहीतरी कारणाने आमच्या घराण्यात तशी प्रथा सुरु झाली असेल. त्यामागे काहीतरी चांगलाच उद्देश असेलही. कदाचित संयमाचा धडा मिळावा हाही हेतू असेल. पण खरोखरच ती गोष्ट आजही केवळ तशी प्रथा किंवा पद्धत आहे म्हणून आंधळेपणाने पाळली पाहिजेच असं काही नाही न? आपला कृषिप्रधान देश आहे. नागाचे महत्व शेतकऱ्यासाठी नक्कीच आहे. त्यामुळेच नागाला देव मानून त्याच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी नागपंचमीचा सण आहे. पण शहरात राहणाऱ्यांना तसे करणे शक्य किंवा संयुक्तिक राहिलंच हे मात्र नाही. त्यामुळेच कुठलेही सण वार आज कालानुरूप थोड्या वेगळ्या पद्धतीने साजरे करणे ही आजची गरज आहे. उदाहरणार्थ नागाप्रती कृतज्ञता व्यक्त करायची असेल तर तुम्हाला माहिती असलेले सर्पमित्रांचे नंबर्स आसपासच्या आणखी १० जणांना द्या. वाटल्यास त्याचे प्रिंटआउट काढून आणखी काही जणांना वाटा. त्यायोगे कुठे साप निघाल्यास त्याला जीवदान मिळू शकेल.तसं बघितलं तर आज बऱ्याच ठिकाणी नवीन पिढी ,नवीन सुना थोड्या वेगळ्या पद्धतीने सण साजरे करतांना दिसताहेत ही एक चांगली सुरवात म्हणावी लागेल. जसे ह्यावेळेस बऱ्याच ठिकाणी वटपौर्णिमा वृक्षारोपणाने साजरी केलेली दिसून आली. खुपदा असे होते घरातील वृध्द व्यक्तींना हे पचनी पडण्यास थोडासा त्रास होतो. त्यांची कुरकुर किंवा "आमच्या वेळेला नव्हते बाई असले प्रकार " म्हणून टीका टिपण्णी सुरु असते . त्यांचेही ठीक आहे. वर्षानुवर्षाच्या सवयी बदलणे अवघड जाणारच. त्याच्या भावना सांभाळून, त्यांना न दुखवता, त्यांना हे पटवून देणे हे बाकी थोडेसे कठीण काम आहे . मधल्या वयोगटातल्या, म्हणजे ४० ते ५०-५५ गटातल्यांची वेगळीच समस्या आहे. त्यांचे आपले कळते पण वळत नाही अशी अवस्था आहे. शिवाय कोण काय म्हणेल ही भीतीही आहे. "अगंबाई, सून मंगळागौर आटोपून ऑफिसलाही गेली वाटते. पूजा तरी व्यवस्थित केली कि नाही? सुटी नाही मिळाली वाटतं? आजकालच्या मुलींना काही हौसच नाही” असे शेजारणीने म्हटल्यावर हमखास हिचा दिवस खराब जाणार. सुनेचं ऑफिसला जाणं आवश्यकच होतं हेही कळते पण मग शेजारणीचा टोमणा …. ? हा झाला "कळतं पण वळत नाही." चा गट. ह्यातला गमतीचा भाग सोडला तरी आज मंगळागौर म्हणा, हरतालिका म्हणा थोड्या वेगळ्या पद्धतीने करण्याची खरच गरज आहे. मंगळागौरीची जागरणे ,विविध खेळ ह्याबाबतही मी असे म्हणेन ते सगळं त्याच पद्धतीने करण्याची गरज आज खरच आहे का? पूर्वी जेव्हा स्त्री चे विश्व रांधा , वाढा, उष्टी काढा एवढेच मर्यादित होते तेव्हा ह्या सगळ्यातून थोडा मोकळा श्वास घेऊन चार घटका मनोरंजन व्हावे , त्या खेळांमधून व्यायाम व्हावा असाच हेतू होता त्याबद्दल वाद नाही पण आजच्या स्त्री ला त्याची गरज आहे का हे ही पाहिले पाहिजे. त्या ऐवजी एखाद्या अनाथाश्रमातल्या मुलांसाठी सुटीच्या दिवशी काही मनोरंजनात्मक कार्यक्रम केला, त्यांना काही पुस्तके, खाऊ वाटला तर चांगली मंगळागौर साजरी होईल. ज्या सुनेला दुसऱ्या दिवशी सकाळी ऑफिस ला जायचेच आहे, एखादी महत्वाची असाइनमेंट आहे अशा वेळेला तिच्या कडून तिने साग्रसंगीत सगळ्या सोहळ्यात भाग घेतलाच पाहिजे हा आग्रहही नक्कीच चुकीचा आहे. अर्थात हा शेवटी ज्याचा त्याचा प्रश्न आहे. हरतालिकेच्या सजावटीसाठी घराघरातून कितीतरी फुले पत्री वापरल्या जाते. तेवढी जरी वृक्षांची ओरबड आपण थांबवू शकलो तरी पर्यावरण संवर्धनात खारीचा वाट नक्कीच उचलू शकतो. बरे दुसऱ्या दिवशी ते सगळे निर्माल्य म्हणून नदी ,नाले, तलावात सोडल्या जाते म्हणजे प्रदूषणात भरच. तरी आता ह्यासाठी अनेक पर्यावरणाशी संबंधित संस्था समाजात जागरुकता आणण्यासाठी प्रयत्न करताहेत ही एक जमेची बाजू आहे. त्यांना सहकार्य करणं आज प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे.
हीच गोष्ट महालक्ष्म्या, गणपती ,नवरात्र, दसरा , दिवाळी, होळी ह्याही सणांसाठी लागू होते. हे सगळे सण नक्कीच साजरे करायला पाहिजेत , त्याचे महत्व पुढल्या पिढीलाही नीट कळले पाहिजे. मात्र त्यातल्या मूळ उद्देशाला तडा न जाता, त्यात अवास्तव भडकपणा न आणता, पर्यावरणाला धक्का न लागता हे सगळ झालं तरच त्यातून सगळ्यांनाच आनंद मिळेल आणि देवही खऱ्या अर्थाने प्रसन्न होतील. खरोखरच सण हे आपल्या संस्कृतीचा आरसा असतात. त्याचे महत्व नाकारता येणारच नाही. सर्वच सण तसं पाहिलं तर पर्यावरणाशी कुठून ना कुठून निगडीत आहेत. त्यामुळेच त्यात स्थळ काळ परिस्थिती नुरूप योग्य ते बदल करणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे अन ती काळाची गरजही आहे. आणि हे सगळे सण साजरे करतांना त्याचा विपर्यास तर होत नाही ना, त्यामुळे पर्यावरणावर काही विपरीत परिणाम तर होत नाही ना? हे डोळसपणे पाहण्याची आवश्यकता आहे. तरच सणांचा आनंद लुटणे आणि संस्कृतीचे जतन करणे ह्या दोन्ही गोष्टी शक्य आहेत.
सौ. मधुमती वऱ्हाडपांडे,
अकोला
--

21 comments:
👌👌
Chhan 👌👌
अगदी योग्य शब्दात सणांचे महत्त्व आजच्या परिस्थितीशी जोडले आहेस.👏👌
👌🏻👍🏻
धन्यवाद !🙏🏻
धन्यवाद ! 🙏🏻
Thanks 😊 🙏🏻
भारतीय सण नवीन पिढीला अगदी सोप्या शब्दात आपण
सांगितले सण व पर्यटन हेही किती आवश्यकता आहे
आपल्या लेखनातून नवीन पिढीला
नक्कीच प्रेरणा मिळेल
डॉ माधव देशमुख
श्री रेणुका टूर्स अँड ट्रॅव्हल्स अकोला
मस्तच
Khup sundar ritya nagpanchami chi mahiti sangitli ma'am aapan
Tya badaal dhanyawaad
काळानुरूप बदल करणे गरजेचे आहे. छान लेख 👌
नागपंचमी पासून सुरवात करून तुम्ही बऱ्याच विषयांना हात घातला. हे वाचून मला शाळेत असतांना वाचलेल्या ना.सी. फडके ह्यांच्या 'हरवले म्हणून सापडले' ह्या लघुनिबंधाची आठवण झाली. एक हरवलेली वस्तू शोधतांना त्यांना ज्या वस्तू सापडतात आणि त्या सापडलेल्या वस्तूंच्या स्मृती त्यांच्या मनात जागृत होतात, त्याविषयी तो लघुनिबंध आहे. तसेच तुमच्या ह्या लेखात आहे, आणि ही लेखक म्हणून फार चांगली गोष्ट आहे. लेखनाचे तुमचे कौशल्य आहेच, त्याविषयी मी आधी बोललो आहेच.अभिनंदन. Keep it up !👍👍👍
नव्या जुन्याचा समन्वय छानच.
अगदी बरोबर
खूप धन्यवाद सर !🙏🏻
धन्यवाद !🙏🏻
थँक्स स्वप्नील !
धन्यवाद नीला !🙏🏻
खूप खूप धन्यवाद सर तुमच्या प्रोत्सहनाबद्दल !🙏🏻!
धन्यवाद 😊
थँक्स अर्चना !
Post a Comment